नाट्यछटा – दिवाकर

(दिवाकर उर्फ शंकर काशिनाथ गर्गे  ह्यांनी रॉबर्ट ब्राउनिंगच्या ‘मोनोलॉग ‘ह्या काव्यप्रकारावरून नाट्यछटा लिहायला सुरुवात केली. नाटकाचा तो अतिलहान  किंवा फार सोपा प्रकार नाही. त्याप्रमाणेच कथेचे ते छोटेसे नाट्यीकरणही नव्हे!दिवाकरांनी सन १९११ ते १९३१ ह्या काळात एकंदर ५१ नाट्यछटा लिहिल्या. मराठी साहित्यामध्ये ‘नाट्यछटाकार दिवाकर “हे नाव चिरस्थायी झाले आहे … त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून  हि एक नाट्यछटा !)

अफिरमेटिव्ह ऍक्शन  !  (Affirmative Action )

“ये,ये,दिनेश, फोनवर सांगितल्याप्रमाणे वेळेच्या आधी थोडा आधीच आलास –काय म्हणतोस?” “मुद्दामच आलो, कारण आपल्याला वॉशिंग्टन  मधून शहांचा  फोन  यायच्या आधी बोलायला थोडा वेळ मिळावा म्हणून !” “बरं तू काय घेणार  थंड का गरम ?”–“अग अलका, आम्ही स्टडीमध्ये बसलो  आहोत. माझ्यासाठी फोन  असेल तर फक्त मला सांग. –चल दिनेश, हे आपले कप  घेऊन आपण तिकडे जाउया.” 
   “अरे दिनेश, अनघा आणि मुले काय म्हणतात?त्यांना घेऊन का नाही आलास?”–तुझे म्हणणे पटले –Can’t mix business with pleasure !”–” बरं का दिनेश, स्पष्टच विचारतो ,मिस्टर शाह ज्या मोठ्या Consulting कंपनीसाठी काम करतात ती कंपनी माझ्यासारख्या छोट्या इंजिनीयरला काम देण्याचा विचार तरी करतील काय?–काय म्हणतोस ,त्याच्यात त्या कंपनीचा स्वार्थ आहे! त्यांना एका minority owned कंपनीला सबकॉन्ट्रॅक्ट द्यायचे  आहे असे ते तुला बोलले.–थॅन्क्स दिनेश, त्यांना माझा फोन नंबर दिल्याबद्दल !”
   “दिनेश,तू ह्या आठवड्याचा Asian Indian News चे शीर्षक वाचलेस का?हे बघ,Army Deployed in More Towns!–कारण ना ? त्या मंडल का बंडल commisionचा रिपोर्ट! पोलिस गोळीबार आणि  विद्यार्थ्यांचे  आत्मबलीदान चालूच आहे–Reservationच्या धोरणामुळे, मध्यमवर्गीय अल्पसंख्यांक बनत आहेत. तुला  माहित आहे,मुंबईत ९५ % मार्क्स  असल्याशिवाय मेडिकलला admission मिळत नाही–हो पण, मागासलेले म्हणून , फारतर ५/१० % मार्क्स जास्त द्या , पण ५०% वाल्याना  मेडिकल तसेच इंजिनीयरिंगला पाठवून त्या proffesions दर्जा खालविता  त्याचे   काय?–“पण दिनेश,आपल्या बापजाद्यांच्या धोरणामुळे  ते मागासलेले आहे म्हणून आजच्या पिढीने काय घोडे मारले आहे?माझा तर ह्या विध्यार्थ्यांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा आहे!”    
  “हो, हो, ऐकू आले अलका! वॉशिंग्टनहून शहांचा फोन आहे ना?–दिनेश तू इथल्या फोनवर बोल. मी बेडरूममध्ये घेतो.” “हॅलो मिस्टर शाह, गुडमॉर्निंग!–Now that Dinesh has introduced us,I would like to know more about your proposal!– काय म्हणता तुम्ही नाशिकचे  असल्यामुळे मराठीत बोलायला हरकत नाही–व! मग अगदी मोकळेपणाने बोलता येईल –आता आले लक्षांत. म्हणून तुम्ही घरी फोन केलात. बरोबर आहे, तुमच्या ऑफिसमधील फोन्सना जादा कान  असतात! “–  “बरं का शहासाहेब, माझी एक छोटीशी consulting firm आहे–हो,सध्या ह्या स्टेटमधील काम करत आहोत परंतु मला फेडरलची कामे घेऊन पसारा वाढवायचा आहे आणि त्यासाठी तुमची मदत हवी आहे. हं ,आता मुद्द्याला हात घालतो.–मी असे ऐकले आहे कि फेडरल सरकारच्या मोठ्या  कामात  Special Affirmative Guidelinesनुसार काँट्रॅक्टच्या काही परसेन्ट कामे आमच्यासारख्या मायनॉरिटी फर्म्सना मिळायला पाहिजेत.  इथल्या rat-raceमध्ये बचावासाठी Affirmative Actionच्या ढालीची आम्हाला अतिशय जरूरी आहे.”–“हे पहा शहासाहेब,१९६४ पूर्वी भारतीयांना ह्या देशात यायला इमिग्रंट व्हिसासाठी अर्जही करता येत नसे. खड्यासारखे वगळले जात असत आपले पूर्वज! मुख्य  प्रवाहाबरोबर जाण्यासाठी  नुकत्याच आलेल्या (Recent ) माझ्यासारख्या इमिग्रंटसना Affirmative Action च्या कुबड्यांची आवश्यकता आहे!– “हो , पुढच्या हालचालींसाठी वॉशिंग्टनला केव्हा  येऊ आम्ही?–जरूर ,दिनेशला घेऊन येणारच. अच्छा ,तर आपली भेट वॉशिंग्टनलाच !                        

  — सुधीर  शं. कुलकर्णी 
  ( पूर्वप्रसिद्ध “एकता ” जुलै १९९६)         

Please send your comments/feedback to sudhirs.kulkarni@gmail.com